“पाण्याचे संकट होत चालले बिकट ... !!!”


'' पृथ्वीव्य त्रिणी रत्नांनी जलमन्नं सुभाषितम्।
मुढै पाषाणखण्डेषु रत्नसंज्ञा विधियते ।। ''
प्रस्तावना ,
पृथ्वीतलावर तीन रत्ने आहेत जल, अन्न आणि सुभाषित. परंतू मुर्ख माणसे दगडांच्या तुकड्यांना रत्नांची संज्ञा देतात. असे प्राचीन ग्रंथामध्ये, सुभाषितकारांनी यथायोग्य वर्णन केले आहे. रत्नतुल्य किंबहुना त्यापेक्षा मौल्यवान असलेले पाणी
हे सजीवांचे प्राण होय.
प्राचीन काळात पाण्याची मुबलकता असतांनाही, सजीवांच्या अस्तित्वामागील पाण्याचे महत्व लक्षात घेऊन सुभाषितकारांना रत्नांची उपमा बहाल करून वाड्ःमय साहित्यात पाण्याला स्थान देणे भाग पडले. आजच्या विज्ञान युगात पाण्याच्या संकटाने विकराल रूप धारण केले तरीही मानवप्राणी पाण्याच्या गुणवैशिष्ट्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. जलसंकटाने जागतिक स्वरूप धारण केले आहे.
पिण्याच्या पाण्याची समस्या बिकट झाली आहे. शहरीकरण व औद्योगिकरण यांमुळे प्रदुषण, शेतीला सिंचनासाठी तुटवडा, जलदगतीने भूजलपातळीत होणारी घसरण, वार्षिक सरीसरी पर्जन्यात होणारी घट, रासायनिक खते व किटकनाशके यांच्या वापरामुळे होणारे प्रदुषण या सर्व बाबी लक्षात घेता नजिकच्या भविष्यात जल संकटाची युद्धजन्य परिस्थीती निर्माण होण्याची शक्यता आहे.
पाणी ह्या निसर्गदत्त देणगीच्या अभावी सजीवांना आपले अस्तित्व टिकविणे शक्य नाही. त्यासोबतच पाणी प्रयोगशाळेत निर्माण करता येत असले तरी आवश्यकतेच्या प्रमाणात निर्माण करणे आर्थिकदृष्टीने परवडणारे नाही. राष्ट्राच्या विकासातील एक महत्वपुर्ण घटक म्हणून पाण्याला अनन्य साधारण महत्व आहे. ही मौल्यवान राष्ट्रीय संपत्ती सामाजिक मालकीची आहे.
पृथ्वीच्या पाण्याच्या उपलब्धतेचे प्रमाण ः-पृथ्वीच्या भूपृष्ठाच्या ७०.८० टक्के भूभाग पाण्याने आणि २९.२० टक्के भाग जमिनीने व्यापलेला आहे. जमिन आणि पाणी यांच्या प्रमाणात पाण्याचे प्रमाण अधिक असले तरी मानवाला वापरण्यायोग्य पाण्याचे प्रमाण कमी आहे. पृथ्वीवरील एकूण पाण्याच्या ९७.३ टक्के पाणी सागरात आहे. सागरातील पाण्यात क्षारतेची पातळी अधिक असल्याने दैनंदिन उपयोगासाठी व शेतीसाठी वापर करणे अशक्य आहे. सागरातील पाणी मासेमारी, मीठ उत्पादन तसेच जल वाहतूक इत्यादी महत्वपूर्ण उपयोगाचे आहे.
सरोवर, हिमनद्या, तलाव, विहीरी, कुपनलिका, धृवीय प्रदेशातील पाणी आणि भूजलसाठा यांचे एकूण पाण्याच्या २.७ टक्के एवढे प्रमाण होते. यावरून असे लक्षात येते की, मानवाला जास्त उपयोगात येणारे पाणी नगण्य आहे. भूतलावरील सर्व सजीवांना (सागरातील वगळून) ह्या २.७ टक्के पाण्यावरच अवलंबून राहावे लागते.
भारत हे विविधतेचे राष्ट्र आहे. भारतात जवळपास २००० (दोन हजार) नद्या आहेत, अनेक धरणे आहेत तसेच वार्षीक सरासरी पर्जन्याचे प्रमाण १२०० मि.मि. एवढे आहे. परंतू उन्हाळ्यात पाण्याचे संकट एवढे रूद्ररूप धारण करते की, जणू अवर्षनच झाले असावे. राजस्थानसारख्या वाळवंटी प्रदेशातील लोकांना स्थलांतर करावे लागते. एकट्या महाराष्ट्रात ४०,००० (चाळीस हजार) खेड्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. यावरून जलसंकटाची कल्पना येणे शक्य आहे. शेतीव्यवसाय, औद्योगिकरण, विजनिर्मिती, मानव, प्राणी, अन्यसजीव, वनस्पती आदिंसाठी लागणा-या पाण्याची टक्केवारी २.७ टक्के एवढीच असतांनाही मानव मात्र जलसाक्षरतेकडे दुर्लक्ष करीत आहे.
शहरीकरण आणि पाण्याचे वाढते संकट ः-विज्ञानाच्या प्रगतीबरोबर लोकसंख्यावाढ आणि चैनिचे जीवन जगण्याची वृत्ती यांमुळे शहरीकरण जलदगतीने होत आहे. याबरोबरच औद्योगिकरणाचाही वेग वाढलेला आहे. लोकांचा ओढा शहरांकडे वाढत चाललेला आहे.त्यामुळे मुंबई, दिल्ली, कलकत्ता, पुणे, नागपूर, चेन्नै , बंगलोर, भोपाळ, हैद्राबाद अशा मोठ्या शहरांची पाण्याची मागणी वाढली. मुंबईला भूजलसाठ्याचे पाणी अपूरे झाल्याने 'तानसा' व ' मोडकसागर ' या धरणांमधून पाणी पुरविले जाते. पुण्याला ' पानशेत ' आणि ' खडकवासला ' धरणांमधून पाणी द्यावे लागत आहे. इतरही मोठ्या शहरांची हिच स्थिती आहे. पिण्याच्या पाण्याचे तसेच इतर वापराच्या पाण्याचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. त्यादृष्टीने "पाण्याचे सुयोग्य नियोजन" ही बाब लोकचळवळ बनने गरजेचे आहे.
धरणांचा मुख्य उद्देश शेतीसाठी सिंचन व विजनिर्मिती हा असतांना गरजेनूसार त्याचा शहर व उद्योगांना पाणीपुरवठ्यासाठी वापर करावा लागतो.
पाण्याचे नियोजन म्हणजे काय ?
"भूगर्भातील आणि भूपृष्ठावरील उपलब्ध जलसंपत्तीचे योग्य विश्लेषण करून संयुक्तरित्या कार्यक्षम वापरास पाण्याचे नियोजन असे म्हणता येईल."
पाण्याची कमतरता आणि सुयोग्य नियोजनाचा अभाव, जनतेची या बाबत अनास्था, शासकिय धोरणांमधील विलंब या सर्व बाबींमुळे नवनविन समस्या निर्माण झाल्यात. पर्यावरण आणि सामाजिक स्वास्थ्यावर अनिष्ट परिणाम झालेत. निसर्गाचा समतोल बिघडला, अनेक प्राणी आणि वनस्पतींच्या महत्वपुर्ण जाती काळासोबत नष्ट झाल्यात.
वनांचे प्रमाण कमी झाल्याने मानवाच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे.
निसर्गातील प्राणी, वनस्पती यांचे मानवासाठी महत्व ः-
निसर्गाने विविध सजीवांमध्ये संतुलन निर्माण करून ह्या सृष्टीला फुलविले. परंतू वैज्ञानिक प्रगती बरोबर मानवाने निसर्गाचे दोहन सुरू केले. चित्ता,वाघ, माळढोक, गिधाढ, डोडो, कावळे, चिमण्या, माकड, साप ह्यांसारखे सजीव नष्ट होत आहेत.
मानवाला पोलिओवर लस बनविण्यासाठी आवश्यक जीवाणू माकडाच्या मुत्राशयात मिळतात. सापांच्या माध्यमातून, प्लेग पसरविणा-या उंदरांवर नियंत्रण ठेवले जाते. अॅन्थ्रॅक्ससारख्या महाभयंकर रोगाच्या "कॅरियॉन" या विषाणूला आळा घालण्याचे सामर्थ्य गिधाडांमध्ये आहे. कुत्र्यापासून होणा-या जलसंत्रास या रोगावरील लस मेंढी आणि कोंबडीच्या गर्भाशायापासून बनविली जाते. पिकांवर येणारी टोळधाड आणि लष्करी अळी यांसारखे रोग चिमण्यांच्या माध्यमांतून नियंत्रित केले जातात. अशाप्रकारे मानवाला उपयोगी पडणार्‍या पशू पक्षांचे अनेक उदाहरणे देता येतील. अनेक वृक्ष उगविण्यासाठी पक्षांचा आधार घ्यावा लागतो. वड, पिंपळ, उंबर, पाकळी, केव्हारिया यांसारखे हजारो वर्ष जगणारे वृक्ष पक्षी नष्ट झाल्यास पृथ्वी वरून नष्ट होतील. डोडोच्या नष्ट होण्यामुळे मॉरिशस बेटावरील केव्हारिया नष्ट झाल्यातच जमा आहे.
प्राण्यांसारखेच वनस्पतीही औषधांसाठी सर्व परिचीत आहेत. परंतू मानवाने निसर्गातीन इतर सजीवांचे जीवनच संपविण्यास सूरूवात केले आहे.
 
सजिवांच्या नामशेष झालेल्या जातीसंदर्भात आकडेवरी वरून दृष्टीक्षेप घातल्यास असे लक्षात येते की, पर्यावरणातील असमतोलाने एके दिवशी सृष्टी संपुष्टात येईल. आज सजीव सृष्टीचे अस्तित्व धोक्यात आले आहे,वेळीच काळजी घेतली नाही तर मानवाला सुद्धा आपले अस्तित्व गमवावे लागेल.
उपरोक्त सजीवांचे अस्तित्व हे वनांची कत्तल, शहरीकरण, औद्योगिकरण, दिवसेंदिवस कमी होणारे पर्जन्याचे प्रमाण, तापमानातील वाढ यांमुळे बाबींमुळे धोक्यात आले. वनांच्या कत्तलीमुळे वाहून जाणा-या पाण्यातील अडथळे कमी झाले त्यामुळे पावसाचे पाणी जलदगतीने समुद्रात वाहुन जाते. जमिनीत पाणी मुरत नाही. त्यामुळे जलसाठा कमी होत आहे. या सर्व बाबी नियंत्रित करण्यासाठी सर्वप्रथम पाण्याचे सुयोग्य नियोजन महत्वाचे आहे.
पृथ्वीच्या तापमानात वाढ झाल्याने, दरवर्षी धृवीय प्रदेशातील हिमपर्वत (ग्लेशिअर) १० फुट या गतीने वितळत आहेत. या प्रकारामुळे समुद्रातील पाण्याची पातळी वाढून अनेक बेटे आणि अनेक देशांचा किनारी प्रदेशातील भूभाग नजिकच्या भविष्यात पाण्याखाली जाण्याचा धका निर्माण झाला आहे. पर्यावरणाच्या -हासामुळे एकामागून एक अशी श्रृंखलाच निर्माण होत आहे. ह्या समस्या मानवाने आपल्या महत्वाकांक्षेनेच निर्माण केल्या आहेत. याबाबत आजच्या पिढीने जागरूक होणे गरजेचे आहे.
औद्योगिकरणामुळे पाण्याच्या प्रदुषणाची समस्या ः-
वैज्ञाानिक संशोधनाच्या माध्यमातून मानवाला नवनविन चैनिच्या वस्तूची निर्मिती करणे शक्य झाले. मनुष्याच्या अवाक्याबाहेरील अवजड कामे करणे शक्य झाले, पृथ्वीवरील नव्हे तर परग्रहावरील माहीती मिळविणे अंतराळयात्रा करणे शक्य झाले. या सर्व बाबींसाठी नैसर्गिक साधनसंपत्तीच्या वापराचे प्रमाणही वाढले. परंतू ह्या निसर्गाच्या समतोलाकडे दुर्लक्ष झाले. जलप्रदुषण ह्यासारखी नवि समस्या व्यापक स्वरूपात समोर आली. कारखान्यांमधून निघणा-या सांडपाण्यात मोठ्या प्रमाणात घातक रसायने सोडली जातात. ते पाणी नदी, नाले यांना दुषीत करते. रसायनयुक्त पाणी जमिनीत मुरल्यावर, दैनंदिन वापराच्या जलस्त्रोतांमध्ये ती रसायने मिसळली जातात.
भारतातील मोक्षदायिनी गंगा नदी जलप्रदुषणाने घातक रसायनांच्या विळख्यात सापडली आहे. गंगेला शुद्ध करण्यासाठी ५९ ठिकाणी शुद्धीकरण प्रकल्प निर्माण केले आहेत. याबरोबरच यमुना नदीच्याही शुद्धीकरणाचे प्रकल्प कार्यरत असतांना ह्या नद्या प्रदुषणापासून मुक्त करणे शक्य झाले नाही.

........श्री.नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश  
BEST REGARDS,
Mr. VipinKumar R. Pawar
Anita's MicroSystems(INDIA)
Site: www.anitasmicrosystems.in
Mob: +91-7875899873

No comments: