तू नक्षलवादी पाहिलाय?
मला कळत नाही, वाघ पाहतात तसा नक्षलवादी ही काय पाहायची गोष्ट असते का?
एखाद्या सिनेमामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी कनिष्ठ अधिकार्याला 'गडचिरोली भेज दूंगा।' म्हणताना दिसतो. कुठल्याही स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकात आदिवासींचा, महाराष्ट्रातील अविकसित आणि नक्षलग्रस्त जिल्हा ही 'गडचिरोली'ची ओळख.
आबांनी गडचिरोलीचं पालकत्व स्वीकारलं. 'ऑपरेशन ग्रीन हंट'चा गाजावाजा झाला; परंतु नक्षलवादाची झळ ज्यांना लागते त्यांची दखल कुणी घेतलीच नाही.
महाराष्ट्राचा सुवर्णमहोत्सव साजरा झाला. गौरव गित ''लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी..'' गायलं गेलं. पण वास्तविकता ही आहे की, दुर्गम भागात राहणार्या आदिवासींना मराठी बोलता येत नाही.
'मराठी-महाराष्ट्र' विकसित म्हणून ओळखला जातो. पण कुठला विकास? फक्त महानगरांचा आर्थिक आणि सांस्कृतिक राजधानींचा.
आज नक्षलग्रस्त भागात शिक्षण, वीज, आरोग्य सेवा, रस्ते या मूलभूत गरजासुद्धा पूर्ण होत नाही. 'नक्षलवादी' हा शब्द काढला की, तोंडचं पाणी पळतं ंलोकांच्या. आजवर कित्येक भूसुरुंग स्फोटाद्वारे बीएसएफ, सीआरपीएफ, पोलीस अधिकार्यांच्या हत्त्या झाल्या. वनखात्यातील अधिकारी बळी पडतात. पण. प्रश्नांची तलवार टांगती!
दुसरीकडे नक्षलवादाची धास्ती इतकी आहे की, या भागातील शाळेवर प्राथमिक शिक्षक जायला घाबरतो. जिथे प्राथमिक शिक्षण नाही तिथे आयआयटीचे स्वप्न कधी बघावं इथल्या मुलाने! ज्यांना चालायलाच वाट नाही त्यांनी उंच आकाशात झेप घेऊन साता-समुद्रापलीकडे कधी जावं? ज्यांचं जीवनच अंधारात चाललंय त्यांनी ३-डी चं समाधान कधी आणावं?
मी नक्षलवादी या शब्दाची सर्मथक नाही पण त्यांच्या समस्या, आदिवासी-अविकसितांच्या अडचणी व त्यावरील उपाय याचा विचार प्रत्येक तरुणाने करावा!
हातात शस्त्र घेतल्याने परिस्थिती सुधारणार नाही हे मान्य पण त्यासाठी माझ्या वयाच्या तरुण मुलांनी ही समस्या समजून तर घ्यायला हवी!
0 comments:
Post a Comment