येड

डोकं फिरल्यासारखे, वारं डोक्यात गेल्यासारखे, ते भिरकावून देतात स्वत:ला. आणि भिडतात जगण्याला. कारण तीच असते त्यांच्या अस्तित्वाची खूण. ती त्यांना कशी सापडते? -त्याचाच हा शोध या अंकात.

तवंग चढलेलं रोजचं जगणं बाजूला ठेवून वेगवेगळ्या मोहिमांना जाणार्‍या भन्नाट माणसांच्या जगण्यावर एक विशेष स्वारी.

पार ‘येडं’च आहे हे !.
ऊन-पावसांत डोंगरदर्‍यांत कशाला कडमडायला जायचं? दगडवाटा कशासाठी तुडवायच्या?
जंगलात फिरून पाय कशासाठी मोडून घ्यायचे?
खालीपिली अंगातून घामटा कशासाठी काढायचा?
पाऊसपाण्यात भिजत कशाला ताप ओढवून घ्यायचा? थंडीत कुडकुडताना कशाला हाडं गोठवून घ्यायची? घरी कपबशी उचलवत नाही, पण पाठीवर धोपटं घेऊन दगडधोंड्यांत हमाल्या कशासाठी करायच्या?
- अरे, बुडाखाली गाडी हवी म्हणून बापाशी पंगा घेतला ना तू? मग कशासाठी हा भिकारचळ?
‘येड’ लागलंय बाबा या पोरांना.
एवढं करून पाहणार काय, तर म्हणे दगडधोंडे, माती, चिखल. किडे, विंचू, काटे, खड्डे, कपारी, गुहा, पडक्या भिंती. बुजलेली पाण्याची कुंडं, कुठल्याशा अक्षरात काहीबाही चिरखडलेली वेडीवाकडी, मोडकी अक्षरं. रया गेलेला भग्न इतिहास. करणार काय? - तर तंगडतोड. उघड्यावरच चार-सहा जणांत मिळून केलेलं मिरची-भाकरीचं जेवण. बर्फापेक्षा गार खडकांवर रात्री झोप घ्यायचा केलेला प्रयत्न. आणि झोप येत नाही म्हणून दोन-चार काटक्यांच्या शेकोटीत रात्रभर मारलेल्या गप्पा.
एवढं करून मिळ(व)णार काय? - तर अंगदुखी, कसकस, कणकण आणि शाळा-कॉलेज-कामाची बोंब !
घरी आल्यावर मग चोळत बसा तेल आणि करत बसा मालीश. दोन-तीन दिवस धड बसता येत नाही की उठता येत नाही. सकाळी ‘लोट्या’ला जायचं तर डोक्याला घाम.
अरे, पण कशासाठी मरायला जायचं तिथे?. **

- या ‘मरणा’तही एक मजा आहे.
पण मेल्यावर कसं वाटतं हे मेल्याशिवाय कसं समज(व)णार? आणि कसं कळणार?
त्याचा अनुभवच घ्यायचा असतो.
किमान एकदा तरी.
कारण तिथे असतो पुनर्जन्म.
तिथे असतो थरार.
तिथे असते झिंग.
तिथे असतो उत्साह, चैतन्य, ऊर्जा.
तिथे असतो तडका. जगण्याचा. जागण्याचा. ‘जागले’पणाचा. जगण्याची मरगळ संपूनच जाते तिथे.
मैत्रीची, भेटीची खुणावणारी ती आस, असोशी असते अगदी जीवघेणी. हो, तो असतोच वेडेपणा. म्हटलं तर मूर्खपणा. बावळटपणा.
पण तसं करण्यासाठी आपण ‘जिवंत’
असायला हवं.
जिवंत असलो म्हणजे सळसळतंच रक्त. उकळ्या फुटतातच आतून. मग अस्वस्थ होतं. भणभणतं. डोक्यात किडे वळवळायला लागतात.
हे किडे मग स्वस्थ बसू देत नाहीत. झोपूही देत नाहीत.
आपल्या जगण्यालाच साद घालत राहतात.!
वाट चालू लागतात. अशीच तिरपगडी.
कधी जंगल खुणावतं, कधी कडेकपारी साद घालतात, कधी 

समुद्राची गाज पोटात कोलाहल करायला लागते, कधी हजारो किलोमीटर तरंगत आलेल्या परदेशी पक्ष्यांची किमान नजरभेट तरी व्हावी म्हणून मन उसासून जातं. अचानक कधी सायकली बाहेर निघतात. गावंच्या गावं तुडवली जातात. सह्याद्रीच्या डोंगररांगा उभ्या-आडव्या पालथ्या घातल्यानंतर कधी अचानक त्या बेलाग हिमालयाच्या पायथ्याशी नतमस्तक व्हावंसं वाटतं. उंचावरून कोसळणार्‍या शुभ्र धबधब्याच्या पोटात कधी शिरावंसं वाटतं. कडेकपारीतून शांतपणे वाहत जाणार्‍या निळ्याशार नदीच्या कुशीत शिरून गाढ निद्रेत जाण्याचा मोह होतो. आकाशातून येणारी मोत्यांची सर कधी थोबाड फोडते. मान खाली घालायला लावते, शिकवते. लाजवते. तरीही ती अशीच अंगभर कोसळत राहावी असं वाटतं.
**

एकाचवेळी ही असते ‘माझ्या’ खुजेपणाची अनुभूती अन् निसर्गाच्या विराट, विलक्षण रूपाचा, शक्तीचा मीही एक अंश असल्याचा साक्षात्कार. माझा हाच अंश मग विश्‍वात मावेनासा होतो. प्रचंड, अतिप्रचंड होतो. डोळे दिपतात त्यानं. माझं हे साक्षात्कारी रूप डोळे भरून पाहायचा मोह मला काही केल्या आवरत नाही. कधीच नाही.
म्हणूनच मी असा कधीतरी डोकं फिरल्यासारखा, वारं डोक्यात गेल्यासारखा माझ्याच देहातून बाहेर पडतो. भिरकावून देतो स्वत:ला. कचकडी आरशांना. आणि भिडतो त्या जगण्याला. कारण तीच असते माझ्या अस्तित्वाची खूण.

**
खरंच मी ‘येडा’ आहे. पण माझ्यासारखे ‘येडे’ आणखीही खूप आहेत.
‘मरतात’ ते हा असा ‘येडेपणा’ अंगात भिनवून घेण्यासाठी. आणि काहीही करतात.
- कारण या ‘मरणा’त एक मजा आहे. गंमत आहे. थ्रिल आहे. नवा जन्म आहे.
खरंच ते शब्दांत नाही सांगता यायचं.
तुम्हालाही घ्यायची ही ‘मरण्याची आणि जगण्याची’ मजा? व्हायचंय ‘येडं’?